Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण उपयुक्त मंच विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर

पुणे : पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे, वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) ची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हा उपयुक्त मंच असून या प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.

येथील विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA)ची पहिली बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त (उपायुक्त) पंकज देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, प्राधिकरणाचे सचिव तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार देवरे उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक विषयक आव्हानांचा सामाना करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची भूमीका अत्यंत महत्वाची आहे. वाहतूक समस्या ही सर्व शहरांसमोरील मोठी समस्या आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाचे काम करताना यामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांबरोबरच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

यावेळी सौरभ राव म्हणाले, पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असून पुणे महानगरपालिकेने तयार केलेली वाहतूक योजना व हॉकर्स योजना लवकरच लागू होणार आहे. कोणताही एक विभाग संपूर्ण वाहतूक व्यवस्थापन करू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. शहरात सुरू असणाऱ्या मेट्रो सारख्या वाहतूक प्रकल्पांनी बाधित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका विशेष प्रयत्नशील आहे. वाहतूकीची समस्या मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबरोबरच लोकप्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे, तसेच पुणे शहराची हरवलेली सायकलचे शहर ही ओळख नव्याने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राधिकरणाच्या मदतीने वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी समन्वयाने काम करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सांगितले.

या बैठकीत महामेट्रा कॅरिडोर 1 व 2 पुणे मेट्रो लाईन 3 कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. एचसीएमटीआर तसेच रिंग रोडच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या पार्किंग सुविधेवर चर्चा करण्यात आली. ई वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याबाबच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणातील अशासकीय सदस्यांनी सादरीकीकरण केले.

या बैठकीला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version