Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परभणीसाठी नवीन १८ बस उपलब्ध करणार – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

मुंबई : परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या आगारात ६६ वाहने उपलब्ध आहेत. राज्यासाठी सोळाशे नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १८ नवीन गाड्या परभणीसाठी देण्यात आल्या आहेत. आणि सहा बस दुरूस्ती करून देण्यात आल्या आहेत. बसमध्ये प्रथमोपचार साहित्य व अग्निशमन उपकरण उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत दिली.

परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेसंदर्भात सदस्य संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. परब बोलत होते.

मंत्री श्री. परब म्हणाले, परभणी आगारातील बस सुस्थितीत असून, यासंदर्भात अधिकारी चुकीची माहिती देत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यासाठी नवीन बस खरेदी करण्यात येणार असून, त्यापैकी १८ नवीन गाड्या परभणीस देण्यात येणार आहेत. गरज भासल्यास याची संख्या वाढविण्यात येईल. प्रवाशांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न एस टी महामंडळ करीत आहे. बसेस किती किमी चालल्या याची नोंद घेण्यात येईल  व नियमानुसार ठराविक कालावधीनंतर त्यांना बाद करण्यात येईल. भाडेतत्वावर इलेक्ट्रिकल वाहन घेताना वाहन चालकाचे योग्य प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का याची तपासणी करण्यात येईल. बस डेपोचे दुरूस्तीकरण सुरु असून, परमिट दिलेल्या बससंदर्भात कुणी गैरव्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. स्कूल बससाठी प्रवास करण्याचे निकष तंतोतंत पाळण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. अपघात होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याची माहितीही मंत्री श्री.परब यांनी यावेळी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री रविंद्र वायकर, राम कदम, सुनील प्रभु, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version