Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या – विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर

पुणे : पुण्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना संदर्भात उपाययोजनाबाबत आवश्यक प्रशिक्षण व  जनजागृतीचे कार्य तातडीने हाती घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे दिल्या. घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांचे प्रमुख व प्रशासकीय विभाग प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर बोलत होते.  यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, बी.जे. मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हॉटेल व्यवसायिक,  पर्यटन कंपन्यांच्या प्रमुखांशी संवाद साधून या व्यावसायिकांकडून येथील परिस्थितीबाबत माहिती  घेतली.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, जगातील 118 देशात कोरोना आजार आढळला आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन म्हणून प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या कार्यालयातील सहका-या ला कोरोना विषाणूबाबत आवश्यक माहिती देणे महत्त्वाचे असून त्याचा जागृतीसाठी उपयोग होईल. प्रशासकीय यंत्रणेकडूनच याबाबत जनजागृतीचे कार्य व्यापक प्रमाणात हाती घेण्यात यावे तसेच कोरोना उपचारासाठी आवश्यक असणारी कोणतीही बाब, उपकरणाची कमतरता भासणार नाही, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाबाबत जनजागृती करण्याबाबत हात स्वच्छ धुणे, खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी, खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाच्या  संदेशाबाबत जनजागृती करण्यासाठी बस स्टँड, होर्डींग्ज्, दूरदर्शन, रेडिओ अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा. केंद्र सरकारने नोव्हेल कोरोना व्हायरस प्रतिबंधाबाबत करावयाच्या उपाययोजना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.  ग्रामीण भागातही कोरोना विषाणु आजाराच्या प्रतिबंधासाठी करावयाची कार्यवाहीबाबत माहिती द्यावी, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यावेळी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या तसेच आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी नोव्हेल कोरोना विषाणूविषयी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी. या विषाणूचा संसर्ग टाळण्याचे उपाय सहज-सोपे असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

करोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारे, शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराने अनुषंगाने नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकतांना, खोकतांना नाक व तोंडावर रुमाल धरावा. करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्याकडे येणा-या प्रवाशांच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेतला तर कोरोना प्रतिबंधाबाबत मदत होणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी याबाबत प्रशासनास सहकार्य करावे तसेच  सर्व टूर ऑपरेटरनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी पर्यटन कंपन्यांच्या प्रमुख्यांना दिल्या आहेत.

यावेळी हॉटेल व्यावसायिक, पर्यटन कंपन्यांचे प्रमुख व विविध विभागाचे प्रशासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version