Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र सदनात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची लगबग होती. तसीच लगबग व उत्साह महाराष्ट्र सदनात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमातही बघायला मिळाला.

कस्तुरबागांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी ‘योग दिनाचे’ आयोजन करण्यात आले. ऐस-पैस जागेवर अंथरण्यात आलेले कार्पेट आणि योगाभ्यासाच्या टापटीप पोशाखांसह अधिकारी- कर्मचारी दिसत होते. पहिल्या रांगेत निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर आणि त्यानंतर शिस्तीत व रांगेत बसलेले महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी –कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमस्थळी मंचावर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योग प्रशिक्षक आकृती राणा आणि संस्थेचे विद्यार्थी कृष्णा आर्य यांनी महत्वपूर्ण योगासनांची माहिती दिली व प्रात्यक्षिक करुन दाखविले. योगासनाचे महत्व पटवून देताना आकृती राणा यांनी योगासनाचे फायदेही समजावून सांगितले.

जवळपास एक तास चालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर क्रियांचा अभ्यास करुन घेण्यात आला. यात, मुख्यत्वे सुक्ष्म क्रीया, ग्रीवा चालन, कटी चालन, घुटना संचलन आदींचा समावेश होता. क्रियेनंतर योगासने झाली. यात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन ही उभी आसने तर बसून करावयाच्या योगासनांमध्ये भद्रासन, वज्रासन, उस्ट्रासन, शशांकासन, उत्तान मुंडकासन आणि वक्रासन ही आसने झाली. पोटाच्या व पाठीच्या सहाय्याने झोपून यावेळी मक्रासन, भुजंगासन, उत्तान पादासन, अर्धहलासन, शवासन ही आसने झाली.

कार्यक्रमाच्या समारोपात प्राणायम आणि ध्यान मुद्रा झाल्या. कपालभाती, शितली प्राणायम क्रियाही उपस्थितांनी केल्या. ‘ओम् सर्वे भवन्तू सुखिन: सर्वे सन्तु निरामया: ….’ अर्थात जगात सर्वत्र आरोग्य व शांतता नांदू दे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version