पुणे : स्वारगेट बसस्थानक येथे पार पडणारा जागतिक ग्राहक दिन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे.
15 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हास्तर व तालुका स्तरावरील प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबीरे, कार्यशाळा, ग्राहक संरक्षण संबंधित विषयावर निबंध, चित्रकला, भित्तीपत्रके, वक्तृत्व स्पर्धा इ. कार्यक्रम आयोजित केले जाणार होते. त्यामुळे या कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर ग्राहक भेट देण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेता कोरोना रोगाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
सर्वांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन रद्द करण्यात आला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.