मुंबई : सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणाची चैाकशी करण्याची व दोषींवर कारवाई करण्याविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. मुंडे बोलत होते. सन २०११ ते २०१७ या कालावधीत अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती व फ्रिशीपच्या योजनांची महाईस्कॅाल पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत होती.
२०१७-१८ मध्ये राज्य शासनाने सर्व विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांकरिता सुरू करण्यात आलेले पोर्टल पूर्णतः कार्यान्वित होऊ न शकल्याने सन २०१७-१८ मध्ये ऑफलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती व फ्रीशिपच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक लाभ संबंधित विद्यार्थ्यांच्या ई वॅालेटवर थेट ऑनलाईनरित्या अदा केले जात आहे. शिष्यवृत्ती योजनेतील गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे श्री. मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री रणजित पाटील, सुरेश धस, विजय उर्फ भाई गिरकर यांनी भाग घेतला.