पुणे : “डॉक्टर” हे समाजातील महत्त्वाचे घटक असून ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांनी स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी च्या उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.
‘आयएमए’ने पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन करून डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या सात देशांचा प्रवास करुन आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करा. याबरोबर त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावे, संपर्कात आलेल्या व्यक्ती इत्यादी सविस्तर माहिती प्राथमिक पातळीवरच घ्या. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना घरातच स्वतंत्र राहायला सांगा. क्वारंटाईनची पध्दत आणि महत्त्व समजावून सांगा. तुमच्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना साफसफाई, हात धुण्याची पध्दत तसेच सामाजिक शिष्टाचाराची माहिती द्या. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी डॉक्टरांनी प्राथमिक खबरदारी बाबत जनजागृती करावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे.
शेखर गायकवाड यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आवाहन करुन सविस्तर माहिती दिली. आयुष प्रसाद यांनीही यावेळी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सांगितले.
डॉ.संजय देशमुख यांनी रुग्णांची सविस्तर माहिती घेण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करा, असे सांगितले. उपस्थित डॉक्टरांबरोबर डॉ.म्हैसेकर यांनी संवाद साधून विविध प्रश्नांना उत्तरे दिली.