नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ या आजाराला जागतिक साथीचा रोग घोषित केल्यानंतर, तसेच या आजाराने युरोपातही अनेकजण दगावल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अमेरिकेत कोरोना विषाणूने बाधितांच्या उपचार आणि सहाय्याकरता ५० अब्ज डॉलर्सचा निधी राखीव ठेवला आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या सर्व राज्यांना आपत्कालीन सहायता केंद्र उभारण्याच्या, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी योजना आखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेतल्या सुमारे २ हजार जणांना कोविड-१९ या आजाराची लागण झाली असून, ४१ जण दगावले आहेत.
जगभरातही या आजाराने दगावलेल्यांची संख्या ५ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे जगासमोर आर्थिक मंदीचे संकटही उभे ठाकले आहे.