नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २ हजार २०० जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा निर्णय दलाने घेतला असून या विम्याचे सर्व हप्ते सीआरपीएफ भरणार आहे.
‘आम्हाला आमच्या वीर जवानांबाबत अभिमान असून, त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो’ या ब्रीद वाक्याला अनुसरुन सीआरपीएफच्या ८१व्या वर्धापनदिनी १९ मार्चला या उपक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी वृत्तसंस्थेला नवी दिल्लीत दिली आहे.
आतापर्यंत वीरमरण आलेल्या जवानांचे नातेवाईक स्वतःच आरोग्य विम्याचे पैसे भरत होते. सीआरपीएफमधे कनिष्ठ पदावर असलेल्या जवानाच्या आयुर्विम्यासाठी संपूर्ण आयुष्याकरता ३० हजाराचा हप्ता, तर वरिष्ठ अधिकार्यांसाठी १ लाख २० हजाराचा हप्ता भरावा लागतो. याबाबतची माहिती सैनिक संमेलनांमध्ये जवानांकडून मिळाल्यानंतर याबाबत निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. यासंदर्भात आरोग्य कार्डाचे वितरणही केले जाणार असल्याचे या अधिकार्याने सांगितले.