पुणे : जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असलेली विविध पथके स्थापन केली असून त्यांच्यामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू बाधित व्यक्ती आढळल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही काही व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जलद प्रतिसाद दल (रॅपीड रिस्पॉन्स टीम) स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय विविध विभागातील वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असलेली पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. या सर्व पथकांनी आपापली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी. परस्पर समन्वयातून या संकटावर मात करावयाची असून आपण यात यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, कटक मंडळे यांच्या बरोबर समन्वय ठेवणे, टूर्स, ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, विमानतळ प्राधीकरण, लॅबरोटरी (प्रयोगशाळा), सेवाभावी संस्था, शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, शहर वाहतूक यांच्याशी संपर्क ठेवून माहिती अद्ययावत करणे, घरातच क्वारंन्टाइन (अलगीकरण)असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवून त्याबाबतची माहिती अद्ययावत ठेवणे अशा विविध जबाबदा-यांची जिल्हाधिकारी राम यांनी माहिती दिली. आरोग्य विभाग तसेच इतर सर्व विभाग समर्पित भावनेने काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
शासनाकडून कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे, त्याचा योग्य पध्दतीने विनीयोग व्हावा, याचीही काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीस विविध कार्यालय प्रमुख उपस्थित होते.