नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन पुष्पांजली अर्पण केली.
संसदेचे अध्यक्ष डॉक्टर शिरीन शर्मिन चौधरी, बांगलादेशाचे सरन्यायाधीश, मंत्री आणि इतर मान्यवरांनीही ढाका इथं शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली वाहिली. आजपासून जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांना सुरवात होत आहे.
‘मुजीब बर्शी’ या नावानं हे कार्यक्रम बांगलादेशमधे तसंच जगभरात विविध ठिकाणी साजरे हात आहेत.
कोरोना विषाणूच्या भितीनं आज होणारी मोठी शोभायात्रा रद्द करण्यात आली तरी ढाक्याच्या ऐतिहासिक सुहरावर्दी उद्यानात संध्याकाळी फटाक्यांच्या आतषबाजीनं साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण देशभरात करण्यात येणार आहे.
यावेळी बांगलादेशाचे अध्यक्ष अब्दुल हमिद, प्रधानमंत्री शेख हसिना देशाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडियो संदेशही प्रसारित करण्यात येणार आहे.