नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजाराविषयीच्या समस्या आणि हा आजार रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाबद्दल माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान देशात कोविड १९ या आजाराला रोखण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न, उपाययोजना तसंच तयारीचा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
या आजाराला रोखण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची क्षमता वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, समाज, तसंच संस्थांसोबत संवाद वाढवण्यावर प्रधानमंत्र्यांनी भर दिला.
या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांशिवाय आणखी काय करता येईल यावर विचार करावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी संबंधित अधिकारी आणि तज्ञांना केली. या आजाराविरोधात पुढाकार घेऊन लढत असलेलं प्रत्येक राज्य, वैद्यकीय आणि निम वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, लष्करी तसंच निम लष्करी आणि हवाई उड्डाण क्षेत्राशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, महानगरपालिकांचे कर्मचारी आणि इतरांबद्दल प्रधानमंत्री यांनी या बैठकीत कृतज्ञता व्यक्त केली.