नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेला लढा म्हणजे या विषाणूविरुद्धचं युद्धच आहे, या विषाणूवर मात करण्यासाठी जनतेकडून आणखी सहकार्याची अपेक्षा आहे, असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
ठाकरे यांनी आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकार करत असलेल्या उपाययोजनांविषयीही माहिती दिली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उपलब्ध आहेत, वैद्यकीय आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह आवश्यक यंत्रणा २४ तास कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी, जनतेनं सरकारनं दिलेल्या सूचनाचं काटेकोरपणे पालन करावं, घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, अफवांवर विश्ववास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. शक्य त्या सर्व प्रकारे गर्दी कमी केली आणि एकजुटीनं प्रयत्न केले तर कोरोनाचा प्रसार वेगानं रोखू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात प्रयोगशाळांची संख्या वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण स्वतः पंतप्रधानांशी बोललो असून, केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करत असल्याचं ते म्हणाले.
सिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटक आणि विद्यार्थ्यांशी आपण चर्चा केल्याचं सांगून, त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण हे संकट, जिद्दीनं परतवून लावू शकू, असं आवाहन त्यांनी केलं.