Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नरडवे सिंचन प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी; ८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार असून परिसरातील 53 गावांतील  8 हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यात नरडवे गावात ‘नरडवे मध्यम सिंचन प्रकल्प’ असून केंद्राकडे राज्य शासनाने या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या मंजुरीमुळे परिसरातील  53 गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून 8 हजार 84  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पांतर्गत गड नदीवर 123.74 दशलक्ष घन मिटर क्षमतेचे धरण बांधण्यात येत आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या या प्रकल्पाचा समावेश ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत’ करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कणकवली तालुक्यातील 40 गाव, कुडाळ तालुक्यातील  5 आणि मालवण तालुक्यातील 8 अशा एकूण 53 गावांतील 8 हजार 84 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

या प्रकल्पास आज मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामास गती येणार असून त्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे.

Exit mobile version