१६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या या प्रकरणातल्या सहा दोषींपैकी पाच जणांना फाशी देण्याचा आणि एका अल्पवयीन दोषीला तीन वर्ष सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयानं २०१३ मध्ये दिला होता.
त्यापैकी एका दोषीनं तुरुंगात आत्महत्या केली होती. तर अल्पवयीन दोषीची तीन वर्षांनी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातल्या चार दोषींनी आपली फाशी टाळण्यासाठी कायद्यातल्या विविध तरतुदींचा वापर करायचा प्रयत्न केला होता.
दक्षिण आशियातलं सर्वात मोठं कारागृह असलेल्या आणि सुमारे १६ हजार कैदी असलेल्या तिहार कारागृहात पहिल्यांदाच एकाच वेळी चार जणांना फाशी देण्यात आली. आहे. या फाशीमुळे यापुढच्या काळात अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा निर्भयाच्या पालकांनी या घडामोडीसंदर्भात प्रतिक्रिया देताना व्यक्त केली. निर्भयाला आणि देशातील लाखो महिलांना न्याय दिल्याबद्दल त्यांनी देशातल्या न्यायव्यवस्थेचे देखील आभार मानले आहेत.