नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदी च्या आवाहनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज सकाळी ७ वाजल्यापासून जनतेने स्वयंप्रेरणेनं लागू केलेली ही संचारबंदी रात्री ९ वाजेपर्यंत असेल.
सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूची दुकानं वगळता बाकी सर्व दुकाने, आस्थापना आणि बाजार बंद आहेत. मुंबईतही दररोज मॉर्निगं वॉकला येणाऱ्यांनी आज घरीच थाबंणं पसंत केलं.
तसंचसकाळच्या वेळी नेहमी गजबजणाऱ्या बाजारपेठांमधे आज शुकशुकाट आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचं उद्दिष्ट समोर ठेवतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९ मार्चला जनतेने २२ तारखेच्या रविवारी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं.
तसंच, जनसेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय कर्मचारी, सफाई कामगार विमानतळ कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलिस दल, प्रसारमाध्यामातले कर्मचारी, रेल्वे,बस, रिक्षा, टॅक्सी सेवेशी संलग्न कर्मचारी, घरोघरी वितरण करणारे कर्मचारी यांच्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहनही जनतेला केले आहे.
सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय नेत्यांनीही जनतेला स्वयंप्रेरणेनं संचारबंदीत सामील व्हावे असे आवाहन केले आहे.