नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांना आजपर्यंतचे सर्वाधिक नुकसान आज सोसावे लागले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल ३ हजार ९३५ अंकांनी कोसळून २५ हजार ९८१ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १ हजार १३५अंकांनी कोसळून ७ हजार ६१० अंकांवर येऊन थांबला. आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे.
सकाळी निर्देशांकांमध्ये १० टक्के घसरण झाल्यामुळे लोअर सर्किट लागले आणि व्यवहार ४५ मिनिटांसाठी थांबविण्यात आले होते. एकाच महिन्यात दोन वेळा लोअर सर्किट लागण्याची वेळ देशातल्या शेअर बाजारांवर पहिल्यांदाच आली आहे. बँकिंग क्षेत्रातल्या समभागांना याचा सर्वाधिक फटका बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील १०६ पैशांनी कोसळून ७६ रुपये २२ पैशांवर पोहोचला. आतापर्यंतची ही निचांकी पातळी आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे निर्माण झालेली जागतिक मंदीची भिती यामुळे भारतीय बाजारात घसरण दिसून आल्याचे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.