मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि पुण्यातल्या कोरोना वैद्यकीय चाचणी केंद्रांना मान्यता मिळाल्यामुळे लवकरच दररोज बावीसशे नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता उपलब्ध होईल अशी माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मुंबईतील परळमध्ये हाफकिन संस्था आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय यांना करोना चाचणी केंद्र सुरू करायला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना नमुने तपासण्यांची क्षमता बावीसशे पर्यंत वाढविण्यात येत आहे,असं देशमुख यांनी सांगितलं आहे.
मुंबईतील जे.जे.महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही आजच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणं शक्य होणार आहे. सात खाजगी प्रयोग शाळांनाही तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.