Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबविणे शक्य – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्र्यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांचेही योगदान प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. वीज कंपन्यांनी अखंडित वीजपुरवठा केल्यामुळेच सरकारला जनतेला घरात थांबविणे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  या कामगिरीबद्दल ऊर्जामंत्र्यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तोंडभरुन कौतुक करत वीज कर्मचारी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे.

कोरोना आजाराचे उपचार करणारे डॉक्टर्स व नर्सेस यांना या आजाराची लागण झाल्याच्या घटना चीन व इतर देशात घडल्यामुळे आरोग्य सेवेच्या क्षेत्रात धोके असल्याची जाणीव आपल्याला आहे. परंतु वीज क्षेत्रात वीज पुरवठा सुरळीत ठेवणारे कर्मचारी हे रोजच जोखीम पत्करून वीज पुरवठा सुरळीत ठेवतात. बऱ्याच वेळा वीज अपघातांना त्यांना सामोरे जावे लागते.  अपघातामुळे जीव जाणे व अपंगत्व येण्याचा घटना घडत असतात. आपल्या घरातील वीज गेली की आपण अस्वस्थ होतो. परंतु वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र, ऊन-पाऊस व थंडीत खांबांवर चढून काम करणे सोपे नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आपण सगळे आज घरात बसले आहोत. परंतु  यावेळी घराबाहेर जाऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम किती जोखमीचे आहे, याची जाणीव त्यांना असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात कलम 144 लागू झाले असून बाजारपेठा व कार्यालये बंद झाली आहेत. कामासाठी कार्यालयात जाता येत नसल्याने  ‘वर्क फ्रॉम होम’साठी वीजपुरवठा सुरळीत असणे गरजेचे आहे. तो सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण विशेष खबरदारी घेत आहे. यासाठी महावितरणद्वारे नियोजन करण्यात आलेले आहे.

गरजेनुसार वीजेचा पुरवठा करण्यासाठी महानिर्मितीच्या वेगवेगळ्या वीज निर्मिती केंद्रात  इंजिनिअर्स आणि कामगार यांनी योग्य प्रकारचे नियोजन केले असून वीजचे उत्पादन करीत आहेत. तसेच वीज केंद्रात निर्माण झालेल्या वीजेचे पारेषण करून महावितरणच्या वीज उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम महापारेषणद्वारे उत्तमरित्या पार पाडत असल्याने  आज आपण घरबसल्या कामे करू शकतो, अशी भावना डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version