पिंपरी : कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा फैलाव थांबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्फ्यु जाहीर केला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला आहे. शिवाय नागरिकांनी ठराविक वेळाने हात धुण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
मागील चार दिवसांपासून नागरिक कुटुंबासह घरीच असल्यामुळे साहजिकच पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जागृत नागरिक महासंघातर्फे पिंपरी चिंंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले की, सध्याच्या परिस्थितीत मनपातर्फे दिवसाआड पध्दतीने चालू असलेला पाणीपुरवठा बदलून तो दररोज 2-3 तासासाठी चालू करावा किंवा सध्याच्या पध्दतीत 2-3 तास जादा पाणी सोडावे, ज्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळेल.
कोरोनामुळे मुळातच सैरभैर झालेल्या नागरिकांना किराणा, भाजीपाला, दूध वगैरे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना, पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागू नये. यासाठी आपण तात्काळ निर्णय घेऊन दररोज पाणीपुरवठा चालू करावा, तसेच अशा आणीबाणीसदृश प्रसंगी योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी जागृत नागरीक महासंघाचे अध्यक्ष नितीन श. यादव यांनी आयुक्तांना केली