नवी दिल्ली : देशात 2011 च्या जनगणनेमध्ये प्रथमच पुरुष -1, स्त्रिया-2 आणि इतर -3 असे संकेतांक पुरवण्यात आले होते. त्याची निवड माहिती देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून होती. माहिती देणाऱ्या व्यक्तीने जर 1 आणि 2 यापैकी निवडण्यास नकार दिल्यास त्या व्यक्तीची नोंद ‘इतर’ मध्ये करून 3 संकेतांक नोंदवण्यात येत होता. भारताच्या जनगणनेमध्ये तृतीयपंथीयांबाबत विशेष म्हणून वेगळी कोणती माहिती गोळा केली गेलेली नाही. तसेच ‘इतर’ या वर्गवारीत केवळ तृतीयपंथीयांचाच नव्हे तर कुठलीही व्यक्ती जिला आपले लिंग या वर्गवारीत नोंदवायचे आहे त्यांचाही समावेश होता. तसेच काही तृतीयपंथीयांनी स्वतःचा उल्लेख पुरुष किंवा स्त्री वर्गवारीत केला असणेही शक्य आहे. 2011 च्या जनगणनेनुसार ‘इतर’ वर्गवारीतली लोकसंख्या 4,87,803 आहे. महाराष्ट्रात ही संख्या 40,891 आहे.
तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी 2018-19 या आर्थिक वर्षात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाला 1 कोटी रुपये वितरित केले आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.