नवी मुंबई : शासनाच्या सुचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना निश्चित केली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी लागणाऱ्या दूध, फळे, भाजीपाला पुरवठा सुरळीतपणे आणि किमान दरात उपलब्ध होण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आाली आहे. बाजार समितीत येणाऱ्या गाड्या आणि व्यक्ती यांना निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉररुम’ स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमसाठी 18002678466 हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या वॉररुममधून सामान घेऊन येणाऱ्या गाड्या ट्रॅक केल्या जातील. गाडी ज्या ठिकाणाहून निघतील तेथून बाजार समितीपर्यंत येईपर्यंत जीपीएसद्वारे माहिती ठेवण्यात येईल. यामुळे बाजार समितीमधील गर्दी नियंत्रण आणि गाड्यांची आवक अगोदरच कळणे निश्चित होणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग कोकण विभागात प्रथमच होत आहे, असेही श्री.दौंड यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय सुविधा पुरेशा मिळाव्यात यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर, साबण, स्कॅनर आदींबाबत पुरेशी तयारी करण्यात आली आहे. आवश्यक बेड आणि वैद्यकीय सुविधांची अतिरिक्त तयारी झाली आहे.
विभागीय आयुक्त श्री.दौंड यांनी आज कोकण विभागातील उद्योग क्षेत्रातील प्रमुखांची बैठक घेतली. गॅस, पेट्रोल, डिझेल, दूध, अत्यावश्यक साधनांच्या निर्मितीचे प्रमुख, आयात निर्यात करणारे व्यापारी आदी बैठकीला उपस्थित होते. विशेषत: अत्यावश्यक सेवेतील वाहनांना आवश्यक ते इंधन उपलब्ध होणेबाबत काळजी घेण्यात यावी. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सुरु करण्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. विशेषत: शासनाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना सबंधितांना दिली.
जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी कोणतीही अडचण आल्यास जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे सुचविण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दाणा बाजार असोसिएशन तर्फे दाणा बाजारमध्ये अडकलेल्या ट्रकचालकासाठी आणि सहायकासाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. निलेश निरा आणि चंद्रशेखर जाधव यांच्यासह दाणाबाजारचे संचालक मंडळ यासाठी विशेष लक्ष घालत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्याची पाहणी आयुक्त श्री. दौंड यांनी केली.
या बैठकीसाठी कोकण परिक्षेत्राचे महासंचालक निकेत कौशिक, आमदार प्रसाद लाड, आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र आण्णासाहेब पाटील, कौस्तुभ बुटाला, उपप्रादेशिक अधिकारी, कृषी व पणन अधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव आदी उपस्थित होते.