“लाॅकडाऊन च्या आदेशाचे असंघटीत बांधकाम कामगारांनी केले पालन” नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे जमा करण्याची- इरफान सय्यद यांची मागणी
पिंपरी : कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. आपल्या देशात ही कोरोना व्हायरस या आजाराशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने काही महत्वाचे आदेश जारी केले आहे. मुख्यत्वे म्हणजे कोरोना व्हायरस या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी २१ दिवसाचे लाॅकडाऊन जाहिर केले आहे .
कोरोना आजाराचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय व आदेश कौतुकास्पद व देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सर्व देशभरातील नागरीक या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून घरात राहत आहे . महाराष्ट्रातील असंघटीत बांधकाम कामगार सुद्धा सरकारी आदेशाचे पालन करीत आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनांचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी या नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात सरसकट पैसे जमा करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री उदधवजी ठाकरे व कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री व सचिव यांच्या कडे एका निवेदनामार्फत केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रातील अनेक कामगार आहेत ज्याचे हातवरचे पोट आहे. बांधकाम कामगार हा असाच हातावर पोट असणारा असंघटीत कामगार आहे.
महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या मंडळाअंतर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांची संख्या १३ लाख ऐवढी आहे. कष्ट करून रोजचे रोज हातावर पोट असणा-या या बांधकाम कामगारावर आज उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशाचे पालन करत त्यांना घरातच राहावे लागत आहे. रोजदारी वर काम करून उदरनिर्वाह करणारे हे कामगार २१ दिवस खाणार काय ? काम बंद असल्याने पोटापुरते कमवणा-या या कामगारांची परिस्थिती 2 दिवसातच बिकट झाली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडेे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांची माहिती आहे. तसेच मंडळाकडे सेस (निधी) जमा आहे. संकटाच्या या कठीण काळात महाराष्ट्रा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळाने या आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
महाराष्ट्र मजदूर संघटना पुणे जिल्ह्यातील २५ हजार नोदंणीकृत बांधकाम कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री व मा. सचिव यांना मागणी करण्यात आली आहे की, सर्व नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात सरसकट रक्कम रू १० हजार DBT मार्फत जमा करावे. जेणे करून या २१ दिवसाच्या लाॅकडाऊन च्या संकटमय काळात ते आपला उदरनिर्वाह करू शकतील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब एक संयमी लढवय्या प्रमाणे या संकटाला तोंड देत आहेत.
मा.मुख्यमंत्री यांनी २० मार्च २०२० ला महाराष्ट्र लाॅकडाऊनचा आदेश दिला त्या दिवसापासून महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी पुणे शहरातील सर्व नाका कामगार व बांधकाम कामगार यांना विनंती पत्र काढुन सर्व कामगार नाकावरील काम बंद करण्यात आले. जेणे करून नाक्यावर व बांधकाम कामाच्या ठिकाणी गर्दी न होता या कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहुन, महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करून या लढ्यात सहकार्य करण्यासाठी सर्व बांधकाम प्रकल्पावरील कामसुद्धा बंद केले. तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी २१ दिवस लाॅकडाऊन केला, त्यांचा महाराष्ट्र मजदूर संघटना व तसेच सर्व कामगार यांनी स्वागत करून केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे.