Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टोकियो ऑलिंपिक आता पुढच्या वर्षी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या टोकियो ऑलिंपिकसाठी या आधीच पात्र ठरलेल्या खेळाडूंची पात्रता, २०२१ ऑलिंपिकसाठी सुद्धा कायम राहणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जगभरातल्या ३२ क्रीडा महासंघांसोबत घेतलेल्या टेली कॉन्फरन्समध्ये, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाश यांनी ही घोषणा केली.

कोरोना विषाणु संसर्गाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी २४ जुलै ते ०९ ऑगस्ट दरम्यान पूर्वनियोजित असलेलं टोकियो आलिंपिक स्थगित करून ते पुढच्या वर्षी घेण्याचा निर्णय,आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं जपानचे अध्यक्ष शिंजो अबे यांच्याशी विचारविनिमय करून अलीकडेच जाहीर केला होता. ही स्पर्धा जरी एक वर्षानं पुढे ढकलली असली तरी या स्पर्धेतल्या ११ हजार नियोजित स्पर्धकांपैकी ५७ टक्के स्पर्धकांनी आपली पात्रता याआधीच निश्चित केलेली आहे; त्यामुळे त्यांची पात्रता पुन्हा ठरवणं हे अन्यायकारक ठरेल असं बाश यांनी स्पष्ट केलं.

उर्वरित ४३ टक्के जागांसाठीची पात्रता निश्चित करण्याकरता घ्यावे लागणारे पात्रता फेरीचे सामने भरवण्यासाठी, ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी किमान तीन महिने वेळ द्यावा लागेल. त्यामुळेच स्थगित केलेलं टोकियो ऑलिंपिक, पुढच्या वर्षी नेमक्या कोणत्या कालावधीत घ्यायचं हे अद्याप ठरवता येणार नाही. मात्र सहभागी खेळाडूंच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीनं पुढील वर्षी उन्हाळा आटोपण्यापूर्वीच म्हणजे मे-जून  या कालावधीतच ते भरवणं इष्ट ठरेल आणि ही निश्चित तारीख साधारणपणे चार आठवड्यानंतर आम्ही जाहीर करू असा खुलासाही बाश त्यांनी केला.

Exit mobile version