नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. २४ तास नागरिकांची सेवा करणारे पोलीसही मदत करण्यात मागे नाहीत. नागपाडा पोलीसांच्या वतीन गरजूंना जेवणाचे डबे आणि आवश्यक वैद्यकीय साधन पुरवली जात आहेत. नागपाडा पोलीस ठाण्याच्या प्रमुख शालिनी शर्मा आणि त्यांचे अन्य अधिकारी नागपाडा परिसरात लोकांना हातमोजे आणि मास्क वाटतानाच, नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहनही ते करत होते. खाजगी कंपन्याही डोनेशन तसंच वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात देत आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशननं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी वानखडे स्टेडियम देण्याचा प्रस्तावही असोसिएशननं राज्य सरकारला दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपनं सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० खाटांचा विलगीकरण कक्ष उभारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांचं एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
काँग्रेसनं त्यांच्या खासदारांचं एक महिन्याच वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसच त्यांच्या आमदारांच एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगपती राहुल बजाज तसच अभिनेता ऋतिक रोशन, कपिल शर्मा आणि दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांनीही आर्थिक आणि वैद्यकीय साधन देण्याचं आश्वासन दिलं आहे. रोजंदारी करणाऱ्या कामगारांना ५० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा सुपरस्टार रजनीकांत यांनी केली आहे.
ताज हॉटेल्स समूहानं विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी आपले हॉटेल तयार ठेवण्याची प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. तसंच वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ताजतर्फे जेवणाची पाकिटं दिली जात आहेत.