Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवश्यक ते उपाय योजले आहेत. जिल्हाधिकारी राम यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि तहसिलदार तृप्ती कोलते यांनी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटनांच्या मदतीने गरजू लोकांना भोजन उपलब्ध करून दिले.

पुणे महापालिकेच्यावतीने येरवडा, पुणे स्टेशन, बोपोडी, शास्त्री रोड या ठिकाणी दिवस-रात्र निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणच्या नागरिकांना डाळ,खिचडी, पुरी भाजी उपलब्ध करून देण्यात आली. बेघर, मजुरांना अन्नदान करु इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींनी कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार तृप्ती कोलते यांनी केले आहे. नियंत्रण कक्षाकडे गरजू व्यक्तींची यादी आहे, त्यानुसार अन्नवाटप होवू शकते. कारण काही अन्नदाते चौकात उभे राहून वाटप करत असल्याने गर्दी होते, संचारबंदीचाही भंग होतो, वाटपात सुसूत्रता रहावी, यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

आज जिल्ह्यात विशाल हिरेमठ यांच्या मिरेकल एड फाऊंडेशनच्या वतीने 1000 लोकांना तयार अन्न वाटप करण्यात आले.
माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने आणि कोरेगाव भीमाच्या तलाठी अश्विनी कोकाटे यांच्यावतीने कोरेगाव भीमा येथे 20 मजुरांना धान्य वाटप करण्यात आले. वाळके तलाठी यांच्या मार्फत ढोक सांगवी येथे 10 मजुरांना धान्य वाटप करण्यात आले.

अन्नधान्य, भोजन वाटपात समन्वय रहावा यासाठी सेवाभावी संस्था, अन्नदात्यांनी तहसिलदार तृप्ती कोलते (+919850719596) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version