Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील रेशनवरील धान्य त्यांना तात्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आज वर्षा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधत होते. आज पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधताना ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे, हि परिस्थिती नाईलाजाने उद्भवली आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा.

शिवभोजन उद्दिष्ट्य वाढवले

या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी, त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही 1 लाख वाढवत आहोत . त्याचा लाभ घ्यावा मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे करू नका.

रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही निर्देश दिले आहेत. पोलीस, महसूल, सहकार, पणन  आणि कामगार विभाग याना यादृष्टीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून, टँकर्स, कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यातून एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो.

ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या असे साखर कारखान्यांना सांगितले आहे. हे कामगार आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा.

दूध संकलन व्यवस्थित होईल

ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल जेणे करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही दिले आहेत.

परराज्यातून आपल्या राज्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत, कुणी इथे काम करणारे कामगार आणि श्रमिक आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी प्रशासन घेईल. काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे.

खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी

खासगी डॉक्टर्सवर देखील मोठी जबाबदारी आहे. या लढाईत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबादारी आमची आहे.

रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन

राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असे मी आवाहन करतो.

कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार हि जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. पोलिसाना सहकार्य देखील आम्ही सूचना दिल्या आहेत.

शिर्डी संस्थानाने 51 कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत, सिद्धीविनायकने देखील 5 कोटी देऊ केले आहेत अशी माहिती देताना ते म्हणाले कि वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो. मात्र योग्य उपचार झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.

Exit mobile version