मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने तालुकास्तरावर एकूण 50 औद्योगिक पार्क उभारण्याची तरतूद केली आहे. तसेच राज्यातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टुरिझम पोलीस’ ही संकल्पना राबविणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
जागतिक व्यापार केंद्राच्या वतीने आयोजित वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात श्री.रावल बोलत होते. यावेळी जागतिक व्यापार केंद्राचे चेअरमन कमल मोरारका,न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राचे संचालक व मुंबईचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष शरद उपासनी,महासंचालक वाय. आर. वरेरकर, वरिष्ठ संचालक रुपा नाईक, आदी उपस्थित होते.
श्री.रावल म्हणाले की, देशातील मनोरंजन, रिटेल उद्योग व बांधकाम क्षेत्राच्या विकासात पर्यटन क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक व परदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी यंदाच्या वर्षी शंभर कोटी राखून ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध धरणांच्या ठिकाणीही पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी खासगी सहभाग घेण्यात येणार आहे.
राज्यातील सिंधुदुर्ग,औरंगाबाद, नागपूर, मुंबई, शिर्डी या प्रमुख पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी टुरिझम पोलीस ही संकल्पना राबविण्यात येणार असून या ठिकाणी पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा पुरविली जाणार आहे. मुरुड येथे 1300 एकरावर पर्यावरणपूरक पर्यटक केंद्रांचा विकास करण्यात येणार असून त्यातून वैद्यकीय पर्यटनास चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र हे देशातील विदेशी व्यापार क्षेत्रात आघाडीचे राज्य आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी महाराष्ट्राने नवीन उद्योग धोरण आणले आहे. त्यामाध्यमातून निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना राज्य शासन करणार आहे. राज्यातील विविध भागात निर्यात व व्यापार केंद्रेही उभारणार आहे. त्याचबरोबर निर्यातक्षम केंद्रांसाठी विशेष निधी उभारणार आहे. काजू प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी 100 कोटी देण्याची तरतूदही या अर्थसंकल्पात केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक व्यापार केंद्राने महाराष्ट्र शासनास सहकार्य करावे. त्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री.मोरारका यांनी स्वागत करून जागतिक व्यापर केंद्र असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली. केंद्राच्या विविध उपक्रमातून नवनव्या कल्पना व माहितीची देवाणघेवाण होत असल्याचे त्यांनी सांगितले.