Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचा सर्व राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था कोविड- 19 साठी विलगीकरण केंद्राच्या रुपात सज्ज

मंत्रालयाचे कर्मचारी किमान एक दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीत जमा करणार

नवी दिल्ली : नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) विरुद्धच्या लढयात सरकारच्या तयारीचा एक भाग म्हणून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने (एमएसडीई) त्यांच्या देशभरातील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (एनएसटीआयएस) आणि वसतिगृहांमध्ये विलगीकरण/अलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या महामारी विरुद्धच्या लढयात सरकार करत असलेल्या प्रयत्नांना जोड देण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे; सरकारी उपाययोजनांचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून सामाजिक अंतर राखण्यास लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 3 आठवड्यांच्या देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

एमएसडीईने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला, कौशल्य भारत अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा कौशल्य प्रशिक्षण प्राप्त सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांची यादी सुपूर्द केली आहे. विविध कामांमध्ये प्रशिक्षित हे उमेदवार नव्याने उभारण्यात येणाऱ्या विलगीकरण/अलगीकरण सुविधांनी युक्त रुग्णालयांमधील संक्रमित लोकांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहित करतील.

याव्यतिरिक्त, 2000 आरोग्यसेवा प्रशिक्षक आणि 500 हून अधिक आरोग्य सेवा मूल्यनिर्धारकांची यादी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया सोबत सामायिक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू महामारी विरुद्धच्या लढयात सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी किमान एका दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी सागितले की, एनएसटीआयएस मध्ये या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जिल्हा आणि राज्य प्रशासनाला संक्रमित व्यक्तीवर उपचार करण्यासाठी पर्यायी रुग्णालये आणि आरोग्य सेवा सुविधा केंद्रांची मदत होईल. “नवीन कोरोना विषाणूच्या या अभूतपूर्व प्रसारामुळे उद्भवलेल्या जागतिक आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर या साथीच्या आजरा विरुद्धच्या लढयात कौशल्य विकास मंत्रालय केंद्र सरकारची सर्वतोपरी मदत करेल. आम्ही एनएसटीआयएस च्या सर्व प्रादेशिक संचालकांना, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना जेव्हा आणि ज्या सुविधांची आवश्यकता असेल त्यांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकार या सर्व कामांसाठी आयटीआयच्या कॅम्पसचा देखील वापर करू शकतात.”

प्रशिक्षण महासंचालनालय संचालित, एनएसटीआय ही प्रमुख संस्था आहे जी देशातील प्रशिक्षण केंद्रे आणि वसतिगृहांमध्ये विशेष कौशल्ये प्रशिक्षण प्रदान करते. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आणीबाणी आणि वेगळ्या कामात मदत करणाऱ्या जवळपास एक लाख उमेदवारांना विविध कामांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Exit mobile version