Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातले ३८ कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या २१५ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी पुण्यात ५, मुंबईत ३, नागपुरात २ तर कोल्हापूर आणि नाशिक मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आज आढळला त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २१५ झाला आहे त्यापैकी ३८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातूनच घरी पाठवण्यात आलं आहे.

सध्या १७७ रुग्ण विविध रुग्णालयात आहेत अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुण्यातल्या खासगी रुग्णालयात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

मुंबईतला वरळी कोळीवाडा आज पासून मुंबई महापालिकेने सील केला आहे. या भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या भागात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही तसेच या भागातील राहिवाशानाही बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येथील सर्वच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातल्या कोरोना कक्षामधे एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातल्या या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवला आहे, मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाला मृत्यूने गाठलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताप आणि खोकल्याच्या रुग्णांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात आत्तापर्यंत एकाही व्यक्तीला कोरोनासदृश लक्षणं आढळलेली नाहीत. जिल्हा रुग्णालयातल्या  विलगीकरण कक्षामध्ये १०  रुग्ण दाखल आहेत.

वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.

मात्र काल बुलडाणा जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याला भेटायला त्याचे वाशिमचे काही नातेवाईक गेले होते. तसेच अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित होते. त्यामुळे त्याच्या एका नातेवाईकाला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयतल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्याच्या इतर नातेवाईकांनीही जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Exit mobile version