मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवारा आणि जेवणाची सोय करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
आश्रमशाळा, वसतिगृह ते आयुक्तालयापर्यंत विविध प्रकल्पांवर कार्यरत सर्व प्रकल्प अधिकारी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी लिहिलेल्या संदेशात ॲड. पाडवी यांनी म्हटले आहे की, आपणा सर्वांना सद्यपरिस्थितीबद्दल माहिती आहे. त्याप्रमाणे, आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. त्याचबरोबर राज्यातील आदिवासी बांधवांची काळजी घेण्याची जबाबदारीही आपल्या सर्वांवर आहे. बरेच आदिवासी बांधव हे विविध ठिकाणांहून घरी जाताना मध्येच अडकलेले आहेत किंवा कामाच्या ठिकाणी अडकले आहेत.
लॉकडाऊनमुळे आदिवासी गावकरी, पाडा रहिवाशांनाही अन्नधान्य मिळण्यास त्रास होत आहे. विविध शहरांमध्ये व खेड्यात अडकलेल्या गरीब, कष्टकरी आदिवासी बांधवांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा गरजू आदिवासी बांधवांना अन्न आणि निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मदत करू शकता. कोणत्याही औपचारिक मंजुरीसाठी, ज्यांना मी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशा उच्च अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधून समन्वयाने सर्व आदिवासी बंधू- भगिनींना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहनही आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी यांनी या पत्राद्वारे केले आहे.