नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात अडकून पडलेल्या परगावातील नागरिकांची ते आहेत तिथेच निवाऱ्याची आणि भोजनासाठी राज्यभर २६२ मदत शिबिरं स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयानं दिली आहे. या शिबीरांमधून ७० हजारांहून मजूर , कामगार आणि बेघरांची सोय होणार आहे.
संचारबंदीच्या काळात राज्यात प्रदेश भाजपाच्या वतीनं सुमारे ५०० कम्युनिटी किचनच्या माध्यमातून २ लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय, जे घरी अन्न बनवू शकतात, त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या कालावधीत हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माध्यमातून रायगड प्रतिष्ठान आणि यशवंत ट्रस्टच्या वतीनं बोरिवली आणि दहिसर परिसरात दररोज ६ हजार गरजूंना मोफत भोजन पुरविण्यात येणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. पी. चिदंबरम यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी खासदार निधीतून १ कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एक कोटींचा निधी पीएम केअर फंडासाठी देण्याची शपथ घेतली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचं वितरण करणाऱ्या कामगाराचा कोविड – १९ या आजारामुळे मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी केली आहे.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारीही एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत. मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन कोरोना विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे.
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनीही एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूरमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्ताच्या अकराशे पिशव्या संकलित करण्याचा संकल्प आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी केला आहे. संकल्पाच्या पहिल्याच दिवशी आज मुरुड आणि यशवंतराव चव्हाजण रूग्णाालयात १७१ जणांनी रक्तणदान केलं.
कोरोना लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी सांगलीतल्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सने ५ हजार N95 मास्क जिल्हाधिकाऱ्यांना सुपुर्द केले.
पालघर जिल्ह्यातल्या गलतरे इथं असलेल्या इस्कॉनच्या गोवर्धन अन्नक्षेत्राकडून पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या कुडूस आणि तलासरी तालुक्यातल्या जवळपास ७०० गरजू लोकांना गेल्या दोन दिवसांपासून दररोज दुपारचं आणि रात्रीचं जेवण पुरवलं जात आहे.