Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्यव्यवस्थेची क्षमता वाढवण्यासाठी हे निर्देश दिले असून, त्यादृष्टीनं काम सुरु झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
मंत्रालयानं याआधीच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला ३० हजार तर नॉयडा इथल्या अॅग्वा हेल्थकेअर कंपनीला १० हजार व्हँटिलेटर्स निर्मिती करायला सांगितलं आहे.
दरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डी.आर.डी.ओ.देखील पुढच्या आठवड्यापासून दरदिवशी २० हजार एन. नाईनटीफाईव्ह या मास्कची निर्मिती करणार असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

याशिवाय दोन स्थानिक उत्पादक दरदिवशी ५० हजार एन. नाईनटीफाईव्ह या मास्कची निर्मिती करत आहेत. पुढच्या आठवड्यापासून ही क्षमताही १ लाखांपर्यंत वाढवली जाईल. तर रेड क्रॉस या संस्थेनं वैय्यक्तिक सुरक्षाविषयक १० हजार साधनांची दिलेली मदत मिळाली असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्विटरवरून कळवलं आहे.

Exit mobile version