मुंबई : मुंबईतील रेल्वे पुलांचे रेल्वे मार्फत, महानगरपालिकेने बांधलेल्या पुलांचे महानगर पालिकांमार्फत आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत बांधलेल्या पुलांचे प्राधिकरणामार्फत ऑडिट करण्यात आले आहे. नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑडिट करण्यासठी नवीन मानके तयार करून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येईल. तसेच मागील काही वर्षात बांधलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, त्याची दुरुस्ती याबाबत कॅग मार्फत ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते टाईम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा पुलाचा काही भाग कोसळून जीवित हानी झाली होती त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महानगरपालिकेने या दुर्घटनेनंतर चौकशी करुन संबधित प्रमुख अभियंता तसेच इतर अधिकाऱ्यावर कार्यवाही केली आहे. या दुर्घटनेत उपायुक्तांचाही जबाबदारी येते का ? याची चौकशी करुन एक महिन्यच्या आत निर्णय घेण्यात येईल. मुंबईतील फारसे वापरात न येणारे स्काय वॉकची पाहणी करून आवश्यकता असेल तर निष्कासित करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात येईल.
या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री विलास पोतनिस, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.