पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जनजीवन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यावसायिक मालमत्तांचा लॉकडाऊनच्या काळातील कर माफ करावा अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो उद्योग कार्यरत आहेत. याशिवाय व्यावसायिक मालमत्ता आहेत. त्याचप्रमाणे हजारो नागरिक घरातच छोटे व्यवसाय व उद्योग चालवित आहेत. या सर्वांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध प्रकारचा कर आकारला जातो. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे.
प्रत्येकजण घरात बसून लॉकडाऊनचे पालन करत देशसेवा करत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता एकही उद्योग किंवा व्यवसाय सुरू नाही. परिणामी, उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे.
अशा स्थितीत सर्वसामान्यांसोबतच उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांनाही माणुसकी म्हणून दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनाही थोडा आधार मिळेल असा निर्णय होण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील व्यावसायिक मालमत्ता, उद्योग व व्यवसायांना आकारण्यात येणारा सर्व प्रकारचा कर माफ करावा. ही माफी लॉकडाऊनच्या काळापुरती मर्यादित असावी अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.