नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी झाली. रस्त्यांवरील वाहनांची रहदारी कमी झाली आणि उद्योगांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना देण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम हवामान व पर्यावरणावर झाला आहे. वाहने आणि उद्योग बंद असल्याने मुंबई शहरातील प्रदूषण कमी झालं आहे.
‘गेल्या वर्षीच्या तुलनेत मागच्या आठ दिवसांत ऑक्साईट ऑफ नायट्रोजनचे ५७ टक्के आणि हवेतील पीएम २.५ चे प्रमाण ५३ टक्क्यांनी कमी झाले आहे. मुंबईतील वाहनांची ये-जा आणि औद्योगिकीरण हे प्रदूषणाचे स्त्रोत आहेत. टाळेबंदीत वाहतूक आणि अनेक उद्योग बंद असल्याने प्रदूषणाचं प्रमाण कमी झालं आहे, असे आयआयटीएम सफरचे संचालक डॉ. गुफरान बेग यांनी आकाशवाणीला सांगितलं.
‘आपल्याकडे मानवनिर्मित घटकांमुळे प्रदूषण जास्त होते. सध्या रस्त्यांवर वाहने नसल्यानं स्वाभाविकपणे प्रदूषण कमी होत आहे. त्यामुळे वाहने आणि औद्योगिक गोष्टींमुळे प्रदूषण कमी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्योगांची उर्जा वापरण्याची कार्यक्षमता वाढवून त्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने नियोजन आणि उपाययोजना केल्या, तर प्रदूषण कमी करता येऊ शकेल, अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ अभिजित घोरपडे यांनी आकाशवाणीला दिली.