लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातले यश दिलासादायक, पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्वाचे
या देशव्यापी लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात आलेल्या अडथळ्यांमुळे संकल्प विचलित होऊ देऊ नका—उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊनच्या आवाहनाला जनतेने तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेला प्रतिसाद दिलासादायक होता, असे सांगत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जनतेच्या संकल्पसिद्धीचे कौतुक केले आहे.
आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, आणि उपलब्ध आरोग्य सेवा, संसाधने हे सगळे बघता लॉकडाऊनचा निर्णय घेणे अपरिहार्य होते. कारण अशा असामान्य स्थितीत असामान्य तोडगा काढणे आवश्यक असते.
लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात जनतेने बाळगलेला संयम दिलासादायक असून, आपण या आव्हानाचा सामना करण्यात यशस्वी होऊ, अशी आशा जागृत करणारा आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
कोरोनाच्या विरुद्ध जागतिक पातळीवर सुरु असलेला लढा यशस्वी करायचा असेल, तर भारताने हा लढा जिंकणे आवश्यक आहे. अत्यावश्यक गोष्टी खरेदी करताना , नागरिकांनी समाजिक अंतर पाळावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
दैनंदिन आयुष्यासाठी गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुरळीत होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अशा लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना दैनंदिन वस्तू मिळण्यात काही अडचणी येणे स्वाभाविक आहे, मात्र त्याला सहकार्य करावे, असे आवाहन नायडू यांनी केले. विशेषतः कामगार आणि शेतमजुरांच्या अडचणी सोडवण्यासाठी, सरकार प्रयत्नशील असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. या संदर्भात, अत्यंत वेगाने प्रयत्न व्हायला हवे. या संकटाने सर्वांच्या माणूसकी धर्माला आवाहन केले असून सर्व समाजाने एकजुटीने वागण्याची गरज आहे, असही उपराष्ट्रपती म्हणाले.
या संकटाच्या काळात लोकांसाठी जे पहिल्या फळीत उभे राहून लढा देत आहेत, अशा सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या लढ्यात सरकारला बळ देण्यासाठी जनतेने ‘पीएम केयर्स निधी’ मध्ये सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. समाजातल्या बुद्धीजीवी वर्गाने आणि सर्व पक्षांनी अशा काळात एकत्र येऊन या आव्हानाचा सामना करण्यात सरकारला मदत करावी, असे नायडू म्हणाले.
अशा कसोटीच्या काळात नागरिकांनी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली.