Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एकदम संचारबंदी न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं त्याचं नियोजन करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातल्या नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते.

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितलं. त्यावर, राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं त्याचं नियोजन करावं, सर्व काही व्यवस्थित सुरु झालंय असं समजून लोकांचे लोंढे रस्त्यावर येऊ नयेत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रधानमंत्र्यांनी केल्या.

कोविड- १९ मुळे जास्त जीवित हानी होऊ नये, यावर आपला भर असला पाहिजे, असं ते म्हणाले. केंद्रानं राज्याला द्यायाचा ११ हजार कोटी रुपयांचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत, असंही मोदी यांनी सांगितलं. राज्य सरकारनं कोरोनाचा प्रसार थांबवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पूर्वी चाचणी कमी होत असल्यानं रुग्णांची संख्या कमी होती.

आता खाजगी प्रयोग शाळांनाही चाचणीची परवानगी दिल्यानं आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे अहवाल एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्यानं, रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचं चित्र दिसतं. मात्र या रुग्णांना  रुग्णालयांत  दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत महानगरपालिका रुग्णालयांमधे विलगीकरणासाठी केवळ २८ बेड्स होते, त्यामध्ये आता २ हजार १०० पर्यंत वाढ केली आहे. पुण्यात कोविड रुग्णालय उभारत असल्याचंही त्यांनी या कॉन्फरन्समध्ये सांगितलं.

Exit mobile version