नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या पायबंदासाठी लावलेल्या संचारबंदीचं उल्लंघन केल्याबद्दल बारामती न्यायालयानं ३ जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि ३ दिवसांच्या कैदेची शिक्षा दिली आहे. या कारणासाठी न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची ही पहिलीच घटना असल्याचं पोलीसांनी सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत अडीचशे जणांवर पुणे शहरात ६०० हून अधिक तर पिंपरी चिंचवडमधे सुमारे ९०० जणांवर संचारबंदी उल्लंघनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संचारबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात संशयास्पद रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून दोन हजार ९५० नागरिकांना घरीच विलगीकरण करण्यात आलंआहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी बातमीदारांना दिली. संचारबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या एक हजार ६२८ नागरिकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसंच संचारबंदी काळात अनावश्यक फिरणारी वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. ऊस तोडणी मजूरांसह औद्योगिकवसाहतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी थांबवून ठेवलं आहे. यामध्ये परराज्यातील दोन हजार मजुरांचा ही समावेश आहे,असंही वारके यांनी सांगितलं.
कोरोना संसर्गाची प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता, औरंगाबाद शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या अकरा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच जमावबंदी उल्लंघन प्रकरणी कारवाई केली आहे. मटनाचं दुकान सुरू ठेवून गर्दी जमवल्याबद्दल एका दुकानदाराविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
धुळे शहरात सकाळी फिरण्याच्या व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या ३२ जणांवर संचारबंदी मोडल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तारलूक्यात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लॉकडाउन मुळे नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी काही ठराविक वेळ देण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केल्याचं वार्ताहरानं कळवलं आहे.