Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना घरपोच जीवनावश्यक वस्तू तर लोहगाव कळस येथे 300 व्यक्तींना दररोज भोजन

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून गरजू, स्थलांतरीत लोकांना जिल्हा प्रशासनाच्या मदतीने वेळेत मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकारातून जिल्हयात परप्रांतातील अडकलेल्या मजूर तसेच गावातील गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग परिस्थितीत प्रशासन एकीकडे आरोग्य सेवा पुरविणे, काही सेवा नव्याने उभ्या करणे यामध्ये व्यस्त आहे. तसेच पोलीस प्रशासनावरही संचारबंदीबाबत बंदोबस्ताचे कार्य आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून ठिकठिकाणी गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून लोहगाव कळस येथे 300 व्यक्तींना दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली तर हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना घरपोहच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत गरजेच्या कालावधीत सुरू असलेल्या या उपक्रमाने अनेकांना आधार दिला आहे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी विजय गायकवाड, सहायक आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर व तहसिलदार सुनील कोळी यांच्या पुढाकारातून हडपसर येथे दिव्यांग व्यक्तींना थेट त्यांच्या घरी जावून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. लोहगाव कळस भागातील 300 व्यक्तींच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेतही दररोज वाढ करण्यात येत आहे. लोहगाव कळस चौकातही भोजन वाटप सुरू आहे. स्थानिक नागरिक, मजूर व गरजू कुटुंबांनी जिल्हा प्रशासनाच्या या मदत वाटप कार्याने आपल्याला गरजेच्या वेळी मदत मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रशासन सर्वच पातळयांवर करीत असलेल्या प्रयत्नांबाबत नागरिक अनेकांनी शासनाचे आभार मानले आहेत.

Exit mobile version