Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे शहरात गरजूंना भोजन वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील अनेकांना आधार

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व भोजन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. न्यू प्रशांत इंटरप्राईजेस केटरिंग या केटरिंग सर्विसेसकडून पुण्यातील गोखलेनगर येथील वडारवाडीतील 55 जळीत कुटुंबांना आणि त्यातील 150 व्यक्तींना दुपारचे जेवण देण्यात येते. यामध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल, ओम प्रकाश पेठे व अशोक नगर गोल्ड यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

चाकण येथील महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपकडून पुणे शहरातील दीड हजार व्यक्तींना दुपारचे जेवण पुरविण्यात येते. पुणे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसिलदार तृप्ती कोलते आणि हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, हवेली तहसिलदार सुनील कोळी यांच्या टीममार्फत शहरातील गरजू व्यक्तींना भोजन वाटप करण्यात येते. हे भोजन वाटप ‘लॉक डाऊन’ सुरू असेपर्यंत चालू ठेवण्यात येईल, असे महिंद्रा ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावीर प्रतिष्ठान, सैलीसबरी पार्क, गुलटेकडी, रेन्बो ग्रूप आणि आदिनाथ फ्रैंड्ज सर्कल यांच्यातर्फे दररोज 1000 विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना जेवणाचे वाटप केले जाते. हा उपक्रम ‘लॉक डाऊन’ घोषित झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून अविरतपणे सुरू आहे. यामध्ये सुनील नहार, अजिंक्य चोरडिया, डॉ. धनराज सुराणा, दिलीप बोरा, अनिल नहार यांचे योगदान लाभले आहे.

Exit mobile version