Site icon साप्ताहिक एकच ध्येय

श्रमिक हो घ्या इथे विश्रांती…!

अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  विविध उपाययोजना राबविताना जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे आपापल्या गावी न जाऊ शकलेले श्रमिक कामगार मोठ्या संख्येने अडकले वा प्रवासात राहिले, ते सारे अकोला जिल्ह्याच्या आश्रयास आले. सध्या २००७ इतक्या संख्येने हे श्रमिक अकोला जिल्ह्यात आश्रयस्थानी आहेत. शासन त्यांना निवास, भोजन आदी दैनंदिन सुविधा देत आहे. सध्या तरी हे श्रमिक इथं विश्रांती घेताना दिसत आहेत.

हैदराबाद येथून २४ मार्चपासून मजल दरमजल करीत सुमारे ६० कामगारांचा एक जत्था मध्यप्रदेशातील मुरेना जिल्ह्याकडे जात होता. सीमाबंदी असल्याने त्यांना २९ मार्चला पातूर येथे अडविण्यात आले. तेथून त्यांना अकोला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले.

येथे त्यांच्यासाठी उत्तम निवास, झोपण्याची सुविधा, पाणी, दिवाबत्ती इतकेच नव्हे तर हे श्रमिक मिळेल तसे निघाले असल्याने अनेकांकडे कपडेही नव्हते तर त्यांना इथं कपडेही देण्यात आले. या शिवाय दैनंदिन लागणाऱ्या वस्तू जसे टुथपेस्ट, ब्रश, साबण, डोक्याला लावण्याचे तेल इ. सर्व साहित्य पुरविण्यात आले. सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना या भवनात ठेवण्यात आले आहे. इथं त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा इ. सर्व सुविधा दिल्या जातात.

याठिकाणी  आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. इथली सुविधा अत्यंत उत्तम आहे. आमची चांगली सोय ठेवल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासन आणि अकोला जिल्हा प्रशासनाचे आभारी आहोत, असे दुर्गाप्रसाद कुशवाह या नंदुकापुरा ता. केलारस, जि. मुरेना यांनी सांगितले.

आम्हाला आमच्या घरी जाण्याची ओढ ही आहेच. आम्हाला इथं आणल्यानंतर असे वाटत होते की आता आम्हाला कसे ठेवले जाणार? पण इथ खूपच चांगली सोय आहे. उत्तम जेवण राहण्याची सोय केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत, असे लखन प्रजापती खेरली ता. संबरगढ, जि. मुरेना हे म्हणतात.

तर सत्यवान कुशवाह नंदुकापुरा ता. केलारस, जि. मुरेना यांनी सांगितले की, आम्हाला एकदम चांगली सुविधा मिळाली आहे, इथले अधिकारी आमच्याशी खूप आपुलकीने बोलले आमची विचारपूस केली, आमचे जेवण, राहणे या सगळ्याची चांगली व्यवस्था केली. इतकेच काय आमची तपासणी सुद्धा केली.

कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारे भय, त्यात कुटूंबियांपासून दूर असल्याने झालेली भीतीची छाया अधिकच गडद. या अशा वातावरणात ते इथं आले. कुणी पायपीट करत तर कुणी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात मध्यवर्ती असणाऱ्या अकोला जिल्ह्याच्या सीमेवर प्रशासनाच्या ताब्यात आले. कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध घालावा या एकमेव हेतूने त्यांना इथं अडवण्यात आलं. इथं ते अडविण्यात आले ते कुणी गुन्हेगार म्हणून नाही तर आश्रीत म्हणून. त्या साऱ्यांची जबाबदारी प्रशासनाने घेतली. अकोला जिल्हा प्रशासनाच्या टिमने या सर्व अडकलेल्या श्रमिकांची विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे.  सध्या जिल्ह्यात २००७ जण आश्रयाला आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी आश्रयाला असलेल्यांची ठिकाणांसह माहिती याप्रमाणे कंसात आश्रितांची संख्या दिली आहे. सध्या एकट्या अकोला शहरात  खडकी (३२७), डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन (६०), शिवनी शिवार (२८), निरघाट (१७०), उगवा (१३०), दहीहंडा (५५), भारीखेड(४९), डाळंबी(३४), चांडक लेआऊट खडकी (६८),  दोंदवाडा(४४),  अष्टविनायक  नगर खडकी(२७),  गोरेगाव खुर्द (२२), माझोद(२१), महसूल कॉलनी खडकी(२१),  कोठारी वाटीका (२०),  अग्रवाल शेल्टर हाऊस(६५) या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कान्हेरी सराफ ता. बार्शी टाकळी, कंपनी शेल्टर हिवरखेड ता. अकोट (२८३), तेल्हारा (२७०), रिधोरा ता. बाळापूर (५१), नगरपालिका हॉल पातूर (५१), गुरुद्वारा लंगर पारस फाटा ता. बाळापूर (२२), राठोड माध्यमिक विद्यालय दहातोंडा ता.मुर्तिजापूर (१२०), मुर्तिजापूर (३८) असे एकूण २००७ जणांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने १२२ आंध्रप्रदेशातील, ४७ बिहार, सहा छत्तीसगड, ८० गुजराथ, ९७ झारखंड, ५० केरळ, ११०९ मध्यप्रदेश, पाच पंजाब, ६५ राजस्थान, ५३ तामीळनाडू, २०२ तेलंगाणा, ४९ उत्तरप्रदेश, एक उत्तराखंड, १ पश्चिम बंगाल, १२० हे महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील आहेत.

या सर्व जणांना राहण्याची सोय, सकाळी शौचालय, आंघोळीची सोय, पिण्याचे पाणी, दोन वेळचे जेवण तसेच आवश्यकता भासल्यास वैद्यकीय तपासणी व उपचार, आपल्या गावाकडील कुटूंबियांशी संपर्कासाठी दूरसंचार सुविधा या सुविधा दिल्या जात आहेत. शासनाने दिलेल्या सुविधांमुळे त्यांच्या आयुष्यातला हा खडतर कालावधी सुसह्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  जिल्हा प्रशासनाने काही ठिकाणी कम्युनिटी किचनद्वारे तर काही ठिकाणी सेवाभावी संस्थांद्वारे जेवणाची सोय केली आहे. जरी गावाकडे पोहोचण्याची आस असली तर हा मुक्काम सुसह्य असल्याचे त्यांच्या थकल्या भागल्या चेहऱ्यावरुन जाणवत होते.

Exit mobile version