Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी

पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये सहभागी होत आहेत. आज मध्यवर्ती इमारत येथे सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांच्या हस्ते व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांचे प्रमुख उपस्थितीत या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.

सामाजिक वनीकरण व  वन विभागाच्या वतीने पालखी सोहळ्यामध्ये  चित्ररथ काढण्यात आला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ  आज मध्यवर्ती इमारत  येथे  झाला. सामाजिक वनीकरण,वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती या चित्ररथांमधून कलापथक, मनोरंजनात्मक जादूचे प्रयोग यांचे माध्यमातून देण्यात येणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी उपवनसंरक्षक श्रीमती ए. श्रीलक्ष्मी, विभागीय वन अधिकारी  नारनवर, विभागीय वन अधिकारी  दिलीप घोलप, विभागीय वनअधिकारी रामदास पुजारी,सहाय्यक वनसंरक्षक सामक, पुराणिक, निकम, वनक्षेत्रपाल गौरी बो-हाडे, संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा या दिंडीचे इंगोले महाराज यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येडवे – बिदरकर गुरूजींच्या कलापथकाने 33 कोटी वृक्ष लागवड योजना, कन्या वन समृद्धी योजना, हरित सेना व इतर शासकीय योजनांबाबत माहिती उत्कृष्टपणे सादर केली तर जादूगार  सोमनाथ पाटील यांनी जादूच्या मनोरंजनात्मक प्रयोगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती केली.

वारक-यांशी व उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. दिनेशकुमार त्यागी यांनी “ वृक्ष हेच आपले जीवन असून, वृक्ष आपल्याला जीवनावश्यक प्राणवायू देत असल्याने प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहीमेमध्ये सहभागी होऊन वृक्ष लागवड व संगोपन केले पाहिजे ” असे त्यांनी नमूद केले.

Exit mobile version