Site icon साप्ताहिक एकच ध्येय

९ जुलैला मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ ‘मौन दिन’

९ जुलैला मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळयाजवळ ‘मौन दिन’

पुणे : राजपत्रित अधिकारी महासंघाच्या प्रलंबित मागण्‍या पूर्ण करण्याबाबतचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठीचे निवेदन राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

महासंघाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज ‘लक्षवेध दिन’ पाळण्यात आला व जिल्‍हाधिकारी राम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, महासंघाच्या कार्याध्यक्ष डॉ. जयश्री कटारे, राज्य उपाध्यक्ष विनायक लहाडे, माहिती सचिव राजेंद्र सरग, वृषाली पाटील, रवींद्र चव्‍हाण, विलास हांडे, विठ्ठल वाघमारे, दुर्गा मंचच्या अध्यक्ष सुवर्णा पवार, सविता नलावडे, ज्ञानेश्वर जुन्नरकर, माणिकराव शेळके, एन. डी. पतंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्‍ट्रातील विविध खात्यातील ७० राजपत्रित अधिकारी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. राज्यात केंद्राप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करणे, सर्व रिक्त पदे भरणे, कंत्राटी पध्दतीने भरती न करता १ लाख ९१ हजार कर्मचा-यांची योग्य मार्गाने भरती करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, वैद्यकीय अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करणे, बक्षी समितीचा वेतनत्रुटी ( खंड -२) अहवाल शासनास सादर करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ५४०० रुपयांची ग्रेड पे ची मर्यादा काढणे, महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्ष बालसंगोपन रजा मिळणे, सातव्या वेतन आयोगाच्या पगारावर केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता देणे, कर्मचारी- अधिका-यांना होणा-या मारहाण, दमबाजीबाबत कठोर भूमिका घेणे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

या मागण्यांवर शासनाच्या वतीने त्वरीत निर्णय घेण्यात आला नाही तर मंत्रालयासमोरील महात्‍मा गांधीजींच्या पुतळयाजवळ शांततेच्या मार्गाने ९ जुलै रोजी ‘मौन दिन’ पाळण्‍यात येणार असल्‍याचे विनायक लहाडे यांनी सांगितले.

Exit mobile version