Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रम

????????????????????????????????????

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत शहरामध्ये सुरुवात करण्यात आला. कोरोना (COVID-19) साथ रोग नियंत्रित आणण्यासाठी नागरिकांच्या दारापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली असून, सोशल डीस्टसिंगचे पालन करून कोरोना सदृश लक्षणे असण्या-या रुग्णांनी या माध्यमातून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर ढोरे यांनी यावेळी केले.

कोरोना (COVID-19) विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. इतर सामाजिक संघटना या कार्यामध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी होत आहेत. याचाच एक भाग म्हणून भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या वतीने ४ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन शहरातील दाट लोकवस्ती असण्या-या भागात जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक सहभागी असणार आहे.

या पथकाकडून शहरातील ६० वर्ष वयापुढील नागरिक आणि भिक्षेकरी यांचीही मोफत तपासणी केली जाणार आहे. हा उपक्रम शहरात कार्यान्वित करण्यात आला. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, आपत्ती व्यवस्थापन मुख्य समन्वयक ओमप्रकाश बहीवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, आदी उपस्थित होते.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परिणामी छोट्या आजारांच्या तपासणीसाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी या मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ज्या परिसरामध्ये ही व्हॅन उभी करण्यात येईल तेथे ध्वनी क्षेपकाद्वारे रुग्णांना तपासणीकामी येण्याबाबत विनंती केली जाईल. डॉक्टर कोण्याच्याही घरी न जाता व्हॅनमध्येच संबंधिताची आरोग्य तपासणी करतील. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे सक्तीचे असेल. सर्दी, खोकला, नाक गळणे, अंगदुखी ही लक्षणे अनेक प्रकारच्या विषाणूजन्य तापामध्येसुद्धा दिसून येतात. यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महानगरपालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय तपासणी केल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास संबधितास त्वरित वेगळे करून पुढील वैद्यकीय चाचण्या केल्या जातील.

Exit mobile version