नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू बाधितांवरच्या उपचारांचा प्रयत्न म्हणून कोरोना विषाणू संसर्गापासून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना बाधित रुग्णांच्या शरीरात सोडण्याचा प्रयोग फ्रान्समध्ये केला जाणार आहे.
कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरात या विषाणूशी लढा देण्यासाठी आवश्यक अँटी बॉडीज निर्माण झालेल्या असतात. या अँटी बॉडी कोरोना बाधित रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढा देतील असा शास्त्रज्ञांना अंदाज आहे. त्यासाठी या चाचण्या केल्या जात आहेत. मंगळवारपासून सुमारे ६० कोरोना बाधितांवर याची चाचपणी केली जाणार आहे. २-३ आठवड्यात त्याचे प्राथमिक निष्कर्ष हाती येतील असा अंदाज आहे.
हैद्राबाद इथल्या भारत बायोटेक कंपनीनं कोविड १९ आजारावरच्या नाकातून देता येणाऱ्या लसीचं संशोधन सुरू केलं आहे. उत्पादन आणि वैद्यकीय चाचण्यांनंतर सुमारे या लसीचे ३० कोटी डोस तयार केले जाणार आहेत.