Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातील २६७ रुग्ण कोरोना मुक्त, राज्यातील ५६ रुग्णांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ४७२ ने वाढली आहे. गेल्या २४ तासात देशभरात एकूण ११ जणांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशात आतापर्यंत एकूण ३ हजार ३७४ व्यक्तींना या विषाणूची बाधा झाली आहे. त्यापैकी २६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे तर आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाला आहे. सध्या देशातल्या २७४ जिल्ह्यांमध्ये या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या 690 झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दुपारी ही माहिती दिली. राज्यातल्या रुग्णांची संख्या ५५ ने वाढली आहे. त्यात मुंबईतल्या 29, पुण्यातल्या 17, पिंपरी चिंचवडमधल्या 4, अहमदनगर इथल्या 3,औरंगाबादमधल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 56 रुग्ण बरे झाले असून उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.
औरंगाबाद मध्ये आज पाच कोरोना संशयित रूग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर शासकीय वैद्यकीय रूग्णालय घाटीतल्या एका ५८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबाद विभागातला हा कोरोनाचा पहिला बळी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या १३ संशयित कोरोनाबाधित रुग्णांना कोविड १९ ची लागण झाली नसल्याचं आज स्पष्ट झालं. हे सर्वजण दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
लातुरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकूण ७० रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. काल नमुने घेण्यात आलेल्या सर्व १४ व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या सुमारे ४ दिवसात दुप्पट
सध्या सुमारे ४ दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होते आहे. नवी दिल्लीतला धार्मिक कार्यक्रम झाला नसता तर रुग्ण संख्या दुप्पट व्हायला सुमारे साडे सात दिवस लागले असते असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज देशभरातले जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस आणि इतरांशी चर्चा केली. विविध औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना कुठलेही अडथळे येऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी यावेळी सर्वांना दिल्या.
सध्या देशभरात २७ हजाराहून अधिक निवारा केंद्र उभारण्यात आली असून साडेबारा लाख लोकांना त्याचा लाभ होतो आहे. याशिवाय देशभरात अन्न वाटपासाठी उभारण्यात आलेल्या १९ हजाराहून अधिक केंद्रांमधून सुमारे ७५ लाख लोक जेवण घेऊन जात असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे. याशिवाय सुमारे साडेतेरा लाख कामगारांना ते काम करत असलेल्या कंपन्यांकडून निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
रत्नागिरीत परप्रांतातून आलेले मात्र संचारबंदीमुळे जिल्ह्यातच अडकलेल्या नागरिकांसाठी, जिल्ह्यात ५३ निवारा केंद्रं सुरू आहेत. या केंद्रांमध्ये सुमारे १५० जणांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था, तर आखणी एक हजार ४०२ जणांची जेवणाची व्यवस्था केली आहे. गरजुंसांठी जिल्ह्यात शासनाच्या शिवभोजन थाळींची संख्याही वाढवली असून, आता खेड, संगमेश्वर आणि गुहागर इथंही शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात शहरातल्या 9 केंद्रांसह व मुक्ताईनगर तालुक्यातल्या एका केंद्रावर जवळपास 925 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
Exit mobile version