नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी भागातले जवळपास ७०० ते ८०० मच्छीमार, खलाशी आणि कर्मचारी समुद्रात १० ते १५ बोटींवर अडकले आहेत. इतर भागातले काहीजणही या बोटींवर आहेत.
जिल्ह्यातले बरेच खलाशी आणि कर्मचारी दरवर्षी गुजरातमधल्या पोरबंदर,सौराष्ट्र, वेरावळ या भागात जहाजसंबंधित कामासाठी महिना ते दीड महिन्यासाठी जातात. लॉकडाऊनमुळे गावी परतण्यासाठी ते निघाले होते. मात्र उंबररगाव इथं पोहोचल्यावर तिथल्या स्थानिकांनी त्यांना गावात उतरण्यास विरोध केला. नारगोळ इथंही त्यांना विरोध झाला. त्यामुळे ते पुन्हा गुजरात मधल्या मरोलीपासून पाच नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात विसावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांना आणल्यास सर्वांचे विलगीकरण करण्यात येणार असल्याचं समजतंय. गुजरातमधून आणखी ४० ते ५० बोटी येण्याची शक्यता असल्याचं महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी सांगितलं आहे.