नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या परिस्थितीत स्वयं आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवावं असं आवाहन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं आहे. देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी काल संवाद साधला.
ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देणे त्याचबरोबर ऑनलाइन परीक्षा घेणे याविषयी सर्वांनी शिफारसी, मते नोंदवावीत यासाठी इग्नूचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणाही निशंक यांनी यावेळी केली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेतृत्वाखाली एक शैक्षणिक वार्षिक वेळापत्रक समिती बनवण्याचा निर्णयही मंत्री निशंक यांनी यावेळी घेतला. ही समिती शैक्षणिक सत्रांना विलंब होवू नये, यासाठी शिफारसी, सल्ले सुचवू शकेल. सद्यस्थितीमध्ये विद्यार्थी वर्गाचे मानसिक आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. यासाठी मनुष्य बळ विकास मंत्रालयातल्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्याची घोषणा यावेळी मंत्री निशंक यांनी केली.