Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पहाणी

पुणे : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. यावेळी पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी.बी.कदम यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून ससून हॉस्पिटलमध्ये नवीन इमारतीत आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. याबाबतची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वैद्यकीय सेवा सुविधेबद्दल डॉ.म्हैसेकर यांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीत यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर आदी बाबींवर चर्चा झाली. ससून रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

Exit mobile version